यह ब्लॉग खोजें

मंगलवार, 1 मई 2018

Book Review in Marathi



“अनुवाद : सिद्धांत आणि प्रक्रिया” - दोन शब्द

आकेळ्ळा चारुमति रामदास


डा. सुरेश शिन्दे ह्यांचे अनुवाद सिद्धांत आणि प्रक्रियेबद्दल लिहिलेले पुस्तक माझ्यासमोर आहे. आता अनुवाद म्हणजे Translation बद्दलंच काही बोलायचं म्हणजे गम्मतंच वाटते. खुद्द  Translation ह्याच शब्दाचे आपण इतकी नावं ठेवली आहेत – कोणी ह्याला अनुवाद म्हणतात, कोणी अनुसृजन, कोणी भाषांतर, तर आणखी कोणी पुनःसृजन ह्या नावाने ओळखतात. मी मात्र सध्या अनुवादह्याच शब्दाचा प्रयोग करण्याचे ठरविले आहे, कारण की प्रस्तुत पुस्तकाचे शीर्षक तेंच आहे.

आपण केव्हांपासून अनुवादाला किंवा पुनःसृजनाला ओळखू लागलोय? आठवतंय का : लहानपणी प्रभु रामचन्द्रानी आकाशातील चंद्रासाठी हट्ट धरला होता. आता चन्द्र आणायचा तरी कसा? राज हट्ट+ बाल हट्ट! पूर्ण तर करायलाच हवा, पण कसा? शेवटी राजा दशरथाच्या वयोवृद्ध मंत्र्याने पाण्याने भरलेली एक परात गच्चीवर ठेवली, चन्द्राचं प्रतिबिंब त्याच झळकूं लागताच बाल-प्रभु आनंदित झाले. तर ही होती पुनःरचनेची एक कल्पना.

मला एखादी परकीय भाषा येत नाही, म्हणून काय तिच्यांत लिहिलेल्या साहित्याशी माझा कधींच साक्षात्कार होऊं शकणार नाहीं? म्हणूनच अनुवाद कार्य सुरू झालं असावं...
भारतांत जेव्हां अनेक कारणांनी आध्यात्मिक, धार्मिक, साहित्यिक इत्यादी रचनांचा अनुवाद होऊं लागला तेव्हांपासून अनुवाद प्रक्रियेचा आरंभ समजला जातो. डा. सुरेश शिंदे ह्याबद्दल विस्ताराने चर्चा करतात.

फक्त एक गोष्ट नमूद करावीशी वाटते : परकीय भाषांमधून थेट मराठीत किंवा हिंदीत अनुवाद आजही जास्त प्रमाणांत होत नाहीये. आपण बरेंचदा इंग्रजी अनुवादावरूनच ते-ते साहित्य आपल्या भाषेंत आणतोय. केल्याने भाषांतरही पत्रिका मात्र थेट परकीय भाषांमधून मराठीत भाषांतरं गेली कित्येक वर्षे प्रकाशित करंत आहे. त्यांचा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे.

म्हणजेच, अनुवादाच्या क्षेत्राला अजून सुसंगठित असं स्वरूप प्राप्त झालेलं नाहीये, बरीच पुस्तकं/ आलेख ह्या क्षेत्रांत प्रकाशित झाली आहे. डा. शिंदे ह्यांनी त्यांची नावं दिलेली आहेत. म्हणूनंच “अनुवाद : सिद्धांत आणि प्रक्रिया” ह्या डा. शिंदेच्या लघु संशोधन प्रकल्पाच्या निष्कर्षांना पुस्तक रूपांत पाहणे सुखद अनुभूति देऊन जाते.

डा. शिंदे ह्यांनी अगदी मन लावून ह्या विषयाच्या अभ्यास केलेला दिसतोय.

भारतांत परकीय साहित्य जेव्हां मराठी भाषेंत येऊं लागलं, तेव्हां भाषांतरकारांसाठी आशय आणि शैलीच्या प्रामाणिकपणासाठी काही कडक नियम घालून देण्यांत आले होते. डा. शिंदे अनुवाद-प्रक्रियेच्या इतिहासावर नज़र टाकून पुढे येतात आणि आपल्या मुख्य विषयाला अगदी अनुवादह्या शब्दाच्या परिभाषेपासून सुरुवात करतात.

“अनुवाद : सिद्धांत आणि प्रक्रियेंत” सहा प्रकरण आहेत :

1.अनुवाद : संकल्पना आणि स्वरूप
2. अनुवाद प्रकार
3. अनुवाद प्रक्रिया
4. अनुवाद : समस्या आणि उपाय
5. अनुवादाचे महत्व आणि योगदान
6. उपसंहार

शिवाय परिशिष्ठांत अनुवाद प्रक्रिया आणि अनुवाद प्रकारांसबधी आलेख दिलेले आहेत; मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांची संदर्भग्रंथ सूची आहे आणि बरीच संकेतस्थळेसुद्धा दिलेली आहेत.

डा. शिंदे ह्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे अनुवाद प्रक्रियेचा, समस्यांचा अभ्यास केलेला आहे, मुद्द्याला समजावून सांगण्यासाठी भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. उदाहरणं हिंदी, मराठी आणि इंग्रजी अनुवादांची आहेत. अत्यंत सारगर्भित असा ग्रंथ तयार झालेला आहे. जवळ-जवळ अनुवाद क्षेत्रांतील सर्वच बाबींकडे लक्ष दिलेलं आहे.   

व्यवस्थित हाताळलेला हा संशोधन प्रकल्प निश्चितंच भाषांतरकारांना आणि संशोधनकारांना निश्चितंच उपयोगी होईल, अशी मला खात्री आहे.

डा. शिंदे ह्यांनी आता ह्या सैद्धांतिक बाबींवर पुरेपूर लक्ष ठेवून साहित्यिक रचनांचं भाषांतर करावं आणि प्रत्यक्षातील आपने अनुभव नमूद करून ह्या क्षेत्रांत आणखी भर घालावी, अशी अपेक्षा आहे.

2.मे. 2018
(डा). आ. चारुमति रामदास
हैदराबाद      
             

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

टिप्पणी: केवल इस ब्लॉग का सदस्य टिप्पणी भेज सकता है.